बक्षिसाच्या नावाखाली महिलेची फसवणूक

सामना ऑनलाईन । मुंबई

बक्षिसात गाडी  लागल्याचे भासवून सायबर भामटय़ाने महिलेची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणूकप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर भामटे हे पूर्वी लॉटरी, परदेशात नोकरीच्या नावाखाली फसवत होते, मात्र आता या भामटय़ांनी गुह्याची पद्धत बदलली आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंगचा नवा ट्रेंड असल्याने याचाच फायदा घेत सायबर भामटे आता नागरिकांची फसवणूक करू लागले आहेत.

तक्रारदार या कांदिवली येथे राहत असून त्या मोबाईलवरून ऑनलाइन शॉपिंग करतात. 30 एप्रिलला त्यांना एकाने फोन खूप शॉपिंग केल्यामुळे तुम्ही गाडी जिंकली आहे असे सांगितले. त्याची माहिती तक्रारदारांना व्हॉटस्ऍपवर पाठवण्यात आली. काही वेळाने त्यांना पुन्हा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण मॅनेजर असल्याचे सांगितले. तुम्हाला गाडीकरिता नोंदणी शुल्क म्हणून पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे भरले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना फोन आला तेव्हा महिलेला इन्शुरन्सकरिता पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा महिलेने गाडी कधी पाठवणार याबाबत विचारणा केली. गाडी तयार आहे, तुम्ही पैसे पाठवा अशा महिलेकडे भूलथापा मारल्या. गाडीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. कांदिवली पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.