बैंगनवाडीतला ‘देवमाणूस’ गजाआड

गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात दवाखाना थाटून नागरिकांवर उपचार करणाऱया बोगस डॉक्टरच्या शिवाजीनगर पोलिसांनी गठडय़ा वळल्या आहेत. विश्वनाथ उदयराज दुबे (52) असे त्या बोगस देवमाणसाचे नाव आहे.  कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच त्याची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी नसतानाही दुबे नावाचा भामटा बैंगनवाडीतील रोड क्रमांक 13 येथे दवाखाना थाटून डॉक्टरकी करत असल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्या दवाखान्यावर छापा टाकला असता विश्वनाथ दुबे हा रुग्णांवर उपचार करताना आढळून आला. रुग्णाच्या जिवास धोका निर्माण होईल हे माहीत असूनसुद्धा त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले व रुग्णांची फसवणूक केली म्हणून विश्वनाथ दुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.