पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये घोटाळ्याचा आरोप; चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने 2018 मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यांच्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रूपये अनुदान बँक खात्यामध्ये जमा केले जात होते. या योजनेत बीड जिल्ह्यामध्ये 20 कोटी रूपयाचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये बीड जिल्ह्यात 20 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार अ‍ॅड.अजित देशमुख यांनी केली आहे. त्यांनी काही गावांची नावे चौकशीसाठी दिली आहेत. शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रूपये अनुदान दिले जाते. आपत्तीग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना राबवली. मात्र, या योजनेमध्ये शेतकरी नसलेल्या नागरिकांना बोगस सातबाराच्या आधारावर आणि निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे घुसडवली आहेत. विशेष म्हणजे या घोटाळ्यात तलाठी, मंडळ अधिकारी आणि नियंत्रण ठेवणारे तहसीलदारही दोषी असल्याचे म्हटले आहे. बीड जिल्ह्यात जवळपास 25 हजार बोगस शेतकरी असल्याची शक्यता आहे. त्यांना आतापर्यंत वाटप केलेले अनुदान चुकीच्या पद्धतीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.