हातचलाखी करून घातला गंडा; पैशांऐवजी दिले कागद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयला भामटय़ाने हातचलाखी करून गंडा घातल्याची घटना मालाड येथे घडली. फसवणूकप्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार मालाड येथील हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. गेल्या महिन्यात ते हॉटेलच्या मॅनेजरचे 21 हजार रुपये बँकेत भरण्यासाठी गेले होते. बँकेत पैसे भरण्याची स्लीप भरत असतानाच एकजण त्यांच्याजवळ आला. स्लीप भरण्यास मदत कर अशी एकाने तक्रारदारांना विनंती केली. त्याच दरम्यान आणखी एकजण त्यांच्याजवळ आला. आपण पुण्याहून आलो आहोत. सोबत तीन लाख रुपये आणले आहेत. तेव्हा तक्रारदारांनी त्याला बँकेच्या बाहेर जाऊन बोलू असे सांगितले.

तक्रारदार बँकेबाहेरील फुटपाथवर थांबले तेव्हा एकजण त्यांच्याजवळ आला. त्याने रुमालात बांधलेले पैशांचे बंडल तक्रारदारांना दाखवले. तुझ्याजवळ असलेले सर्व पैसे मला दे आणि माझ्याकडील दीड लाख रुपये तू घे अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी 21 हजार रुपये एकाला दिले. तक्रारदार हे बँकेत शिरले. त्यांनी तो रुमाल उघडून पहिला असता त्या रुमालात पैशांऐवजी कागद होते. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार बँकेच्या बाहेर आले. तक्रारदारांना पाहताच ते दोघेजण पळून गेले. त्यांनी त्या दोघांचा पाठलाग केला. फसवणूकप्रकरणी त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.