
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जुने कामगार असल्याचे भासवून एका खासगी वीज कंपनीची फसवणूक करणाऱ्या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. वैंकय्या सुक्का, जॉन चेट्टी आणि विजय कौडर अशी त्या तिघांची नावे आहेत. जॉन, विजय हे कामगार असून वैंकय्या हा कंत्राटदार आहे.
तक्रारदार हे खासगी वीज कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. तेथे कंत्राटी तत्त्वावर कामगार भरती केली केली जाते. गेल्या वर्षी कंपनीने एफआरएस पद्धत सुरू केली होती. कामगारांचे आधारकार्ड आणि हाताचे ठसे घेण्यात आले होते. एफआरएस केलेल्या कामगारांचे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे तपासली जात होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एफआरएस पद्धतीत कागदपत्रे तपासात असताना काही कामगारांनी बनावट कागदपत्रे दिल्याचे कंपनीच्या लक्षात आले.
कंत्राटदाराने बनावट कागदपत्राच्या आधारे नवीन कामगारांना ते जुने कामगार असल्याचे भासवले होते. फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारदाराने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम कदम यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी वैंकयाला ताब्यात घेतले. वैंकया हा कंत्राटदार असून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे एफआरएसमध्ये नोंदणी केली होती. त्याच्या चौकशीत जॉन आणि विजयची नावे समोर आली. त्या दोघांनादेखील पोलिसांनी अटक केली. विजयने जुन्या कामगाराच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्याने बनावट आधारकार्ड कुठून बनवले याचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































