
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात शूटिंगची परवानगी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्या प्रकरणात आरे पोलिसांनी एका लाइन प्रोडय़ूसरला अटक केली आहे. वन अधिकाऱयांनी कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. सुमारे 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वन अधिकाऱयाने आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अधिकाऱयाच्या तक्रारीवरून गणेश ठाकूर नावाच्या लाइन प्रोडय़ूसरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शूटिंगसाठी अटी व शर्तींवर परवानगी मिळाल्यानंतर वन विभागाला एकूण 64 लाख रुपये भरायचे होते, मात्र विभागाला केवळ 39.59 लाख रुपयेच प्राप्त झाले. वन विभागाला आरोपीकडून सादर केलेल्या पावतीवर बनावट शिक्के आणि क्रमांक होते. त्यामुळे सरकारचे सुमारे 24 लाख रुपयांचे नुकसान झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
– प्राथमिक चौकशीत प्रॉडक्शनशी संबंधित काही लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीने परवानगी मिळवण्यासाठी मोठी रक्कम आरोपीकडे दिल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीने प्रॉडक्शन हाऊसकडून जादा पैसे उकळून सरकारी शुल्क जास्त दाखवून फरकाची रक्कम स्वतःकडे ठेवली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.





























































