
साडेसात लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून सायबर ठगाने निवृत्त बँक अधिकारी महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारला. लॉटरीच्या नावाखाली ठगांनी महिलेची साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार या सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. गेल्या वर्षी त्या एका सरकारी बँकेत वरिष्ठ पदावरून निवृत्त झाल्या. निवृत्तीपूर्वी तक्रारदार या नवसारी येथील शाखेत काम करत होत्या. ऑगस्ट महिन्यात नवसारी येथील शाखेत एक पत्र आणि क्रॅच कार्ड आले. नापतोल कंपनीचा 12 वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त कंपनीने एक स्पर्धा आयोजित केली होती. तुम्हाला साडेसात लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे भासवले. त्या पत्रामध्ये एक नंबर होता. साडेसात लाख रुपयांची लॉटरी लागल्याने पत्रावर असलेल्या नंबरवर महिलेने फोन केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठगाने महिलेला फोन करून लॉटरीचे पैसे बँक खात्यात पाठवण्यासाठी बँक खात्याची माहिती देण्यास सांगितली. त्यावर विश्वास ठेवून महिलेने एका बँक खात्याचा नंबर दिला.
नंबर दिल्यानंतर ठगाने पुन्हा महिलेला फोन केला. पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू होत असून त्यासाठी तुम्हा सर्व्हिस टॅक्स म्हणून 8 हजार 250 रुपये भरावे लागतील असे सांगितले. महिलेला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यानी पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर ठगाने महिलेला त्याचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड व्हॉट्सऍपवर पाठवले. त्यावर असलेली जन्मतारीख खरी असल्याने महिलेला विश्वास बसला. महिलेने गुगल पेच्या माध्यमातून एकाच्या खात्यात 8 हजार 250 रुपये जमा केले. पैसे जमा केल्यावर महिलेला व्हॉट्सऍपवर पावती पाठवण्यात आली. पावती पाठवल्यानंतर महिलेला जीएसटी कर आणि लेट फी जमा करण्यास सांगितले. महिलेने पैसे जमा केल्यावर त्यांना पुन्हा फोन करून विविध कराच्या नावाखाली महिलेकडून साडेबारा लाख रुपये उकळले. पैसे भरल्यानंतर त्यांना व्हॉट्सऍपवर येणारे मेसेज बंद झाले. त्या नंबरवर फोन केला असता तो नंबरदेखील बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

























































