
शेतकऱ्यांची व्यापाऱयांकडून कापूस खरेदीत लूट
तालुक्यातील मालपूर परिसरातील गरजू शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावात कापूस विक्रीला काढला आहे. परतीचा पाऊस सतत धुमाकूळ घालत असल्यामुळे ओला झालेला कापूस नाइलाजास्तव कमी दरात विकावा लागतो आहे. सरकारनेही तुटपुंजी मदत केली. आता व्यापारी नाडत आहेत. शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात मातीमोल झालेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने घरातच पडून आहे.
भालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात या कापसाची प्रत खराब झाल्यामुळे तसेच कापसाला काहीअंशी ओलावा आढळून येत असल्याने हक्काची बाजारपेठ किंवा खरेदी केंद्र नाही. त्यामुळे खासगी व्यापारी मनमानी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना दिसून येत आहे, तर शेतकरीदेखील नाईलाजास्तव आगामी हंगामाच्या भांडवलासाठी कमी दराने विक्री करीत आहे. आगामी रब्बी हंगामपूर्व शेतीच्या मशागतीसाठी बी-बियाणे कापूस वेचणी मजुरीसाठी हातात पैसे शिल्लक नसल्यामुळे हमीभावापेक्षा कमी भावात सध्या येथे खरेदी-विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यंदा येथे पावसाच्या पाण्यावर मोठय़ा प्रमाणावर कापसाची लागवड झाली. सर्वात जास्त कापूस लागवड क्षेत्र या वर्षी दिसून आले. सप्टेंबरपर्यंत पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना यंदा अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सततच्या पावसामुळे या स्वप्नावरदेखील पाणी फिरले. होत्याचे नव्हते होऊन शेतकऱ्याच्या शेती पिकाचे नुकसान झाले. यात कापूस ओला झाल्यामुळे इच्छा नसताना नाइलाजास्तव विक्री करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापूस वेचणी काही दिवस थांबवली होती. मात्र आता काही दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे वाढती मजुरी देऊन वेचणीच्या कामाला सर्वत्र गती मिळाली असून कापसात काही प्रमाणात ओलावा दिसून येत आहे. म्हणून कमी दरात कापूस विक्री करण्याची शेतकऱ्यांची यंदा मजबुरी आहे.
नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी येथील परिसरात किंवा दोंडाईचा बाजारपेठेत हक्काचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. ओलावा जास्त असल्याने सीसीआयच्या निकषात कापूस बसत नाही. त्यामुळे जोपर्यंत 10 टक्क्यांपेक्षा आर्द्रतामुक्त कापूस बाजारात येत नाही तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होणार नसल्याचे समजते. यामुळे हा ओला कापूस ठेवावा तरी कुठे या विवंचनेतच खासगी व्यापाऱयाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या येथून खासगी व्यापारी कापूस खरेदी करून गुजरात, मध्य प्रदेश राज्यांतील बाजारपेठेत किंवा जिनर्सना विक्री करीत असल्याचे समजते. यंदा कापसाची आवकही नसल्यामुळे हे व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांपासून खरेदी करतात. यामुळे तीन घटकांचा नफा वजा जाता हा भाव पदरात पडत असल्यामुळे कवडीमोल भाव मिळत आहे. यासाठी प्रशासनाने शेतकरी व जिनर्स यामधले दोन घटक बाजूला करून कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व हमीभावापेक्षा कमी भावाने कुठेही कापूस खरेदी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

































































