लग्नाच्या नावाखाली महिलेची फसवणूक; ठगाने मारला बँक खात्यावर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नासाठी हिंदुस्थानात येत असताना विमानतळावर आपले परदेशी चलन पकडल्याच्या भूलथापा मारून ठगाने महिलेची 1 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला या अंधेरी परिसरात राहतात. गेल्या वर्षी त्यांनी लग्न जुळवणाऱया एका वेबसाईटवर नाव नोंदवले होते. नाव नोंदवल्यानंतर त्यांना आदित्य नावाच्या व्यक्तीची रिक्वेस्ट आली होती. त्याने आपण परदेशात डॉक्टर असल्याचे भासवले. आपल्याला लग्न करायचे असून लवकरच हिंदुस्थानात येत आहे, हिंदुस्थानात आल्यावर कायमचे स्थायिक होणार असल्याच्या ठगाने भूलथापा मारल्या. त्यावर महिलेने विश्वास ठेवला. गेल्या वर्षी महिलेला त्या ठगाने फोन केला. आपण हिंदुस्थानात येण्यासाठी निघालो आहे, सोबत परदेशी चलन घेऊन येत असल्याचे त्याने भासवले. त्यानंतर दुसऱया दिवशी ठगाने फोन केला. मी हिंदुस्थानात आलो असून विमानतळावर उभा आहे. माझ्या जवळ परदेशी चलन जास्त प्रमाणात असल्याने विमानतळावर कस्टम अधिकाऱयाने पकडले आहे.

परदेशी चलन जास्त बाळगल्याने मला हिंदुस्थानी चलनात दंड भरावा लागणार आहे. माझ्याकडे हिंदुस्थानी चलन नसल्याचे ठगाने महिलेला सांगितले. भावी पतीला पकडल्याने त्याच्या सुटकेसाठी महिलेने विविध बँक खात्यांत असे 1 लाख 90 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यावर महिलेने त्या नंबरवर फोन केला. आदित्य आणि ज्या नंबरवरून फोन आला होता तोदेखील नंबर बंद येत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासासाठी सायबर सेलची मदत घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय बेळगे यांनी सांगितले.