
सामना प्रतिनिधी, मुंबई
एसबीआय बँकेच्या प्रेटिड कार्ड सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी करून माटुंगा येथील एका गृहिणीला एक लाखाचा चुना लावण्यात दिल्लीच्या तिघा भामट्यांना यश आले. पण वेळीच आपली फसवणूक होत असल्याचे कळताच त्या महिलेने कस्टमर केअरला कॉल करून कार्ड ब्लॉक केले. परिणामी भामट्यांनी केलेले चौथे ट्रान्झॅक्शन रद्द झाले. नेमक्या याच रद्द झालेल्या ट्रान्झॅक्शनची डिटेल माटुंगा पोलिसांसाठी उपयुक्त ठरली.
माटुंगा येथे राहणारे चंद्रशेखर गद्रे (53) हे पालिकेत कार्यरत आहेत. गृहिणी असलेल्या त्यांच्या पत्नी शीतल गद्रे यांच्याकडे प्रेटिड कार्ड आहे. त्यांना 3 जुलै रोजी कॉल आला होता. एसबीआयच्या प्रेटिड कार्ड सेंटरमधून बोलत असल्याचे कॉलर म्हणाला. तुमचे कार्ड बंद होणार असून ते चालू ठेवण्यासाठी कार्डची डिटेल द्या असे कॉलर म्हणाला. त्यानुसार शीतल यांनी कार्डची सर्व माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी नंबर आले. ते नंबरदेखील शीतल यांनी कॉलरला दिले. ओटीपी नंबर मिळताच आरोपींनी शीतल यांच्या कार्डवरून चार ट्रान्झॅक्शन करून एक लाख रुपये आपल्या बँक खात्यात वळते केले. दरम्यान, पैसे जात असल्याचे मेसेज मोबाईलवर येताच शीतल यांनी लगेच त्यांचे कार्ड ब्लॉक केले. वेळीच कार्ड ब्लॉक झाल्यामुळे आरोपींनी केलेले चौथे ट्रान्झॅक्शन रद्द झाले. त्यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शीतल यांनी तक्रार दिली. मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटणकर, उपनिरीक्षक मारुती शेळके, अंमलदार विकास मोरे आणि संतोष पवार यांनी तपास करून शीतल यांना फसवणाऱया दिल्लीतल्या भामट्यांना पकडून आणले.
कॉल सेंटर सोडून फसवाफसवी सुरू
काही दिवसांपूर्वी साहिल हा दिल्लीतल्या एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता. सर्व कामकाज शिकल्यानंतर त्याने कॉल सेंटर सोडले आणि लोकांना फसविण्यास सुरुवात केली. यासाठी विपिन त्याला बँक खाती आणि सीमकार्ड पुरविण्याचे काम करायचा, तर साहिल त्याच्या घरात बसून लोकांना फोन करायचा आणि पैसे वळते करून घ्यायचा. त्याच्या घरातून दोन लॅपटॉप, 22 सीमकार्ड, तीन फोन, 58 सीमकार्डचे कव्हर, नागरिकांच्या प्रेटिड कार्डची माहिती असलेले 40 ते 50 कागद हस्तगत केले आहेत.





























































