कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांसाठी मोफत अ‍ॅम्ब्युलन्स

863

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना सर्वत्र चिंता व्यक्त होत असतांना कोरोनाबाधीत रुग्णाना दवाखान्यात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सधारक अव्वाच्या सवा रक्कम उकळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कल्याण डोंबिवलीत मात्र या लुटमारीला खुद्द पालिकेनेच आळा घातला आहे. कोरोना रुग्णांना मोफत अॅम्ब्युलन्स सेवा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण झपाट्याने आढळून येत असल्याने पालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. प्रशासनाने संपूर्ण पालिका कार्यक्षेत्राचे सर्व्हेक्षण केल्यानंतर 87 कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कल्याण, डोंबिवली, 27 गावे, टिटवाळा येथील ज्या भागात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत असे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत.

पालिका क्षेत्रात 570 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. एखाद्या भागात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी कुटुंबाला मोठी कसरत करावी लागते. एक तर अॅम्ब्युलन्स देण्यास कोणी तयार होत नाही. एखादा अ‍ॅम्ब्युलन्स चालक येण्यास तयार झालाच तर दोन हजारांपासून आठ हजरापर्यंत रक्कम उकळतात. एकूणच कुटुंबांची होणारी परवड लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने खासगी अॅम्ब्युलन्स ताब्यात घेतल्या आहेत. रुग्णाचे घर ते हॉस्पिटल या दरम्यान मोफत सेवा दिली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या