किंग्ज सर्कल स्थानकापासून बेस्टची मोफत ‘रिंगरूट’ सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत अनेक उड्डाण पुलांवर अवजड वाहनांना बंदी घातल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे होणारे हाल बंद करण्यासाठी बेस्ट मदतीला धावली आहे. बेस्ट प्रशासनाने किंग्ज सर्कल स्थानकातून गुरुवारपासून मोफत बस सेवा सुरू केली आहे.

शहरातील अनेक महत्त्वाच्या उड्डाणपुलांवर अवजड वाहतुकीवर बंदी आल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विशेष बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर आज किंग्ज सर्कल स्थानकाजवळील पूल बंद केल्याने नागरिकांनी आंदोलन केले. येथे पूल बंदी आल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे बेस्टकडून तातडीने येथे किंग्ज सर्कल स्थानकापासून बेस्टची मोफत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस रिंग रूट पद्धतीने चालवण्यात येणार आहे. त्यानुसार किंग्ज सर्कल स्थानकापासून ही बस लोकमान्य टिळक रुग्णालयाकडील उड्डाणपुलाकडे जाऊन पुन्हा या स्थानकाकडे परत येणार आहे. या मार्गावर एक बस सेवा चालवली जात असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पद्धतीने अन्य मार्गांवरही अशा प्रकारे बस सेवा चालवण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.