फ्रेंच ओपनचा किंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रिडा प्रतिनिधी । मुंबई

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू रफाएल नदालने रविवारी लाल मातीवरील किंग आपणच असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. ३२ वर्षीय रफाएल नदालने जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रीयाच्या डॉमिनिक थीमचा ६-४, ६-३, ६-२ अशा फरकाने धुव्वा उडवत अगदी दिमाखात फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. हे त्याचे या स्पर्धेचे ११वे जेतेपद ठरले हे विशेष. तसेच यावेळी त्याने १७वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची करामत करून दाखवली.

डॉमिनिक थीम हा रफाएल नदालला क्ले कोर्टवर हरवणारा गेल्या दोन वर्षांतील एकमेव टेनिसपटू होता. त्यामुळे या दोन खेळाडूंमधील लढतीकडे जगभरातील तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. पण टेनिसकोर्टवर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. रफाएल नदालच्या झंझावातासमोर डॉमिनिक थीमची डाळ शिजली नाही. अखेर रफाएल नदालने सरळ तीन सेटमध्ये डॉमिनिक थीमचा फडशा पाडला आणि चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला.

वयस्कर अन् महान खेळाडूंनी गाजवली दोन वर्षे
रॉजर फेडरर व रफाएल नदाल या दोन अनुभवी व अनुक्रमे ३६ व ३२ वर्षांच्या टेनिसपटूंनी मागील दोन वर्षे गाजवलीत. २०१७ साली रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून या विजयी मालिकेची सुरुवात केली होती. त्यानंतर या दोन महान खेळाडूंनी सलग सहा ग्रॅण्डस्लॅम आलटूनपालटून जिंकलीत हे विशेष. या दोन खेळाडूंशिवाय इतर कोणालाही या दरम्यान ग्रॅण्डस्लॅम जिंकता आलेले नाही.