
अमेरिकेची टेनिसपटू कोको गॉफ आणि रशियाची युवा खेळाडू मीरा ऑण्ड्रिव्हा यांनी फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. कोको गॉफने सलग पाचव्यांदा अंतिम आठमध्ये स्थान मिळवले आहे, तर 18 वर्षांची मीरा दुसऱ्यांदा या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, तृतीय मानांकित अमेरिकेची जेसिका पेगुलाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
या वर्षीच्या दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत द्वितीय मानांकित कोको गॉफने 20व्या मानांकित रशियन एकातेरीना अलेक्सांद्रोव्हाला 6-0, 7-5 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत पुढील फेरी गाठली. दुसरीकडे अमेरिकेच्या पेगुलाला फ्रान्सच्या बिगरमानांकित लुआ बोएसॉ हिने जबरदस्त पुनरागमन करत 3-6, 6-4, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. दरम्यान, सहाव्या मानांकित मीरा ऑण्ड्रिव्हाने चौथ्या फेरीत 17व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या दारिया कसातकिनाला 6-3, 7-5 ने हरवत आपला विजयक्रम सुरूच ठेवला आहे.