राधाकृष्ण ते कांतारा… जूचंद्रच्या रांगोळी कलावंतांनी जिंकली मने

तालुक्यातील जूचंद्र गाव म्हटले की डोळ्यासमोर येते ती या मातीतील कला. यात नाटय़ कला, भजन आणि रांगोळी या कलेच्या प्रांतात येथील तरुण आणि तरुणींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कला सातासमुद्रापार गेली आहे. येथील कलाकार हे दरवर्षी दिवाळीत एकत्र येऊन आपल्या कलेचे प्रदर्शन रसिकांना घडवत आहेत. या वर्षीही त्यांनी भरवलेल्या रांगोळी प्रदर्शनात शिवाजी महाराज, हिंदुस्थानी सैनिक, एकवीरा देवी, बाल गणेश, थ्रीडी रांगोळी, राधा-कृष्ण, युद्ध आणि युद्धातील स्थिती यावरील रांगोळ्या रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रांगोळ्यांचे प्रदर्शन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मनोज पाटील, प्रवीण भोईर, जय म्हात्रे, करण वटा, गणेश सालियन, साई भोईर, संजय पाटील, केतन पाटील, हर्षद पाटील व इतर रांगोळी कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या आहेत.