
तामीळनाडू विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. एआयएडीएमकेच्या उमेदवार लीम रोज मार्टिन या राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. त्या तिरुचिरापल्ली जिह्यातील लालगुडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे शिक्षण सहावीपर्यंत झाले असून त्यांच्याकडे 5 हजार 863 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लीमा यांनी या वर्षी इंडिया जननायका कांची पार्टी सोडून एआयएडीएमकेत दाखल झाल्या आहेत.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, लीमा यांच्याकडे 139 कोटी रुपयांची चल संपत्ती, 910 कोटींची अचल संपत्ती आहे. त्यांचे पती मार्टिन यांच्याकडे 3 हजार 262 कोटींची चल संपत्ती, तर 887 कोटींची अचल संपत्ती आहे. मुलगा जोस टायसन याच्या नावावर 225 कोटींची चल संपत्ती आणि 439 कोटींची अचल संपत्ती आहे. मागील वर्षभरात लीमा रोज यांनी 9.82 कोटींची, पतीने 11.39 कोटींची कमाई केली आहे. संपत्तीशिवाय लीमा यांच्याकडे 19,233 ग्रॅम सोने, 1,31,813 ग्रॅम चांदी, 1217 पॅरेटचे हिरे आणि 32 ग्रॅम प्लॅटिनम आहे.




























































