
सामना प्रतिनिधी । देवरुख
संगमेश्वर तालुक्यात ६५० हेक्टर जागेवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट तालुका कृषी विभाग आणि पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्यात येणार आहे.
फळबाग लागवडीतून पर्यावरण संतुलन व भविष्यात शेतकऱ्यांना फळ निर्मितीतून आर्थिक प्राप्ती या मुख्य उद्देशाने शासन प्रतिवर्षी फळबाग लागवडीसाठी उद्दिष्ट देत असते. यानुसार यावर्षी तालुका कृषी विभागाला २० हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर पंचायत समिती कृषी विभागाला ६३० हेक्टर असे एकूण ६५० हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले आहे.
पंचायत समिती कृषी विभाग ग्रामपंचायत स्तरावर फळझाडांची लागवड करणार आहे. तर तालुका कृषी विभागाने २० गावांची प्रत्येकी १ हेक्टर फळबाग लागवडीसाठी निवड केली आहे. या गावांत आंबा, काजू या फळझाडांची प्रामुख्याने लागवड केली जाणार आहे. लागवडीसाठीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या दोन्ही विभागाकडून ग्रामसभा घेऊन लागवडीचे महत्व विषद केले जात आहे. ग्रामसभेतून ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी, मंडल कृषी अधिकारी लागवडीबाबतचे उद्दिष्ट स्पष्ट करत आहेत.
या लागवडीसाठी असलेली शासनाची नियमावली देखील ग्रामसभांमधून सांगितली जात आहे. या लागवडीत फळधारणा करणाऱ्या रोपांची म्हणजेच आंबा, काजू या रोपांची लागवड प्रामुख्याने केली जाणार आहे. उर्वरित काही टप्प्यांत कोकम, आवळा, फणस अशा रोपांची देखील लागवड केली जाणार आहे. तालुका कृषी विभाग आणि संगमेश्वर पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडून या रोपांचे वाटप केले जाणार आहे. जुलै महिन्यामध्ये संपूर्ण लागवड पूर्ण करावयाची आहे. यासाठी वरिष्ठ शासकीय अशिकाऱ्यांकडूनही मार्गदर्शन केले जात आहे.

































































