मंडणगड तालुक्यात इंधन टंचाईची समस्या

मंडणगड तालुक्यात 3 पेट्रोलपंप आहेत. या तीनही पेट्रोलपंपांवर गेल्या महिन्याभरापासून इंधन तुटवड्यााची तीव्र समस्या जाणवत आहे. त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायावर होत आहे.

मंडणगड तालुक्यात मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या जाणवायला हवी होती, मात्र याउलट इंधनाची गेल्या महिनाभरापासून तीव्र टंचाई जाणवत आहे. मंडणगड शहरात 1 आणि धुत्रोलीत 2 असे मिळून 3 पेट्रोलपंप मंडणगड तालुक्यात आहेत, मात्र या तीन्ही पेट्रोलपंपावर गेले महिनाभर इंधन टंचाई होत असल्याने पेट्रोलपंपावर इंधनाचा टॅंकर आला की, आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी रांगच रांग लागत आहे.

शहर आणि शहरालगतच्या गावातील वाहन चालक- मालक आपल्या वाहनांमध्ये इंधनाचा टॅंकर आल्याची चाहुल लागताच वाहनांच्या टाक्या फुल्ल करत आहेत, मात्र ग्रामीण भागातील वाहन चालक, मालकांना याचा मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. याचा परिणाम हा रिक्षा चालक, वडाप, माल वाहतूक करणाऱ्यांच्या व्यवसायावर अधिक होत आहे त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.