
पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 717 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी सिंहस्थ पुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे.A
राज्य सरकारने सन 2025-26च्या अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ पुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर पुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्राधिकरणाला अर्थसंकल्पीत तरतुदीपैकी 283 कोटी रुपयांचा निधी 15 ऑक्टोबर 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. आता उर्वरित 717 कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय काढला.
कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या आराखडय़ाला राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे वितरित केलेला निधी सदर कामावर खर्च करावा. निधीचा विनियोग करताना वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष तसेच अटी आणि शर्तींचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिकचे विभागीय आयुक्त यांची राहील, संबंधित कामांना सक्षम प्राधिकाऱयाची प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता झाल्यानंतरच सदरचा निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


























































