पित्याला दिला चार मुलींनी खांदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामनेर

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्व दिले जाते. मात्र, ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चालली आहे. याचाच प्रत्यय वाकोद गावात आला. मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

येथील प्रतिष्ठित व्यापारी व नवजीवन प्रोव्हिजनचे संचालक राजकुमार राणुलाल बोहरा (49) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी जैन धर्मानुसार संथारा व्रत धारण केले होते. त्यांची अंत्ययात्रा 30 मार्च रोजी आनंदनगर येथून त्यांच्या राहत्या घरून निघाली. राजकुमार बोहरा यांना चार मुली व एक मुलगा असल्याने त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी चारही मुली पुढे सरसावल्या. यातील एक मुलगी विवाहित असून, तीन मुली अविवाहित आहेत तर मुलाचे वय 14 वर्षे आहे. नेहा, प्रिया, यशस्वी, तेजस्वी यांनी दुःखात स्वतःला सावरून पित्याच्या पार्थिकाला खांदा दिला. जामनेर येथे मुलींच्या खांद्यावरून निघालेली ही पहिलीच अंत्ययात्रा नव्या युगाची नांदी ठरली आहे. राजकुमार बोहरा यांच्या वाटय़ाला मुलींच्या खांद्याचे भाग्य लाभले, असा सूर यावेळी ऐकावयास मिळाला.