
पश्चिम रेल्वेच्या प्रतिष्ठत मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बुरशीयुक्त ब्रेड नाश्त्यात दिल्याने 36 प्रवाशांची तब्येत बिघडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर सुरत येथे रेल्वे प्रवाशांवर उपचार करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयआरसीटीसीने संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करीत त्याला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसच्या प्रवासा दरम्यान सी-6 आणि सी-7 या डब्यातील प्रवाशांना मागणीनुसार ब्रेड बटर देण्यात आले. मात्र ब्रेड खाल्यानंतर काही प्रवाशांना मळमळू लागले. त्यानंतर लागलीच सुरत स्थानकात गाडी थांबवून प्रवाशांची डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. ब्रेडला बुरशी लागल्याचे आढळल्याने मुदत संपलेल्या ब्रेडचे वाटप झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली.




























































