
कॉलेजच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून बारावी, जेईई, सीईटी आणि नीटची तयारी करून घेणाऱया खासगी कोचिंग क्लासेसचा अर्थात इंटिग्रेटेड कॉलेजचा बाजार यंदा उठला आहे. मागील दोन वर्षांपासून शालेय शिक्षण विभागाने केलेली कारवाई त्याचबरोबर यंदा लॉक डाऊनमुळे पालकांच्या उत्पन्नाला बसलेली कात्री यामुळे फीच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱया या कॉलेजांच्या अकरावी सायन्सच्या बहुसंख्य जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. याउलट अकरावी सायन्सच्या अनुदानित जागांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून केवळ बारावीपर्यंतचे वर्ग असणाऱया कॉलेजमधील जागाही हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
ज्युनियर कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचे साटेलोटे
काही ज्युनियर कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचे साटेलोटे असून विद्यार्थ्यांना कॉलेजच्या उपस्थितीतून सूट मिळण्याच्या नावाखाली काही कोचिंग क्लास विद्यार्थ्यांना ठरावीक कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचे सूचवतात. या एका विद्यार्थ्यांच्या प्रवेशापोटी कॉलेज 30 ते 35 हजार रुपये कमावितात, असा आरोप ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशचे हेमंत शिंदे यांनी केला. वर्षभर या कॉलेजमध्ये उपस्थित न राहताही या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेसाठी 100 टक्के हजेरी लागते. वर्षभर हे विद्यार्थी क्लासेसनाच जातात. केवळ प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी कॉलेजची पायरी चढतात, असेही शिंदे यांनी सांगितले.
या ज्युनियर कॉलेजमध्येही 100 टक्के प्रवेश
व्ही,पी.कन्नडा-मुलुंड, वर्सोवा वेलफेअर, शेलेंद्र एज्युकेशन सोसायटी, योजना विद्यालय-बोरिवली, वालिया ज्युनियर कॉलेज-अंधेरी, सेंट थाँमस-गोरेगाव, एसएसएस मल्टीपर्पज-पंतनगर, रत्नम ज्युनियर काँलेज- भांडुप, महाराष्ट्र कॉलेज- नागपाडा, सर्वोदय ज्युनियर काँलेज- चेंबूर.
अकरावीचे 100 टक्के प्रवेश झालेली काही कॉलेज
सेंट झेवियर्स, सेंट अँण्डज, साठये, पाटकर, झुनझुनवाला, केसी, नँशनल, ज्ञानसाधना, कीर्ती, जयहिंद, मिठीबाई, रूपारेल, रूईया, एसआयईएस, सोमय्या, भवन्स, वझे-केळकर, आचार्य-मराठे.
इंटिग्रेटेड कॉलेजविरोधात राज्य सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. पालकांमध्ये या कॉलेजांविषयी विश्वासार्हता राहिलेली नाही. या कॉलेजांमधून सायन्स शाखेचे पारंपरिक शिक्षण न देता केवळ प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. यंदा कोरोनामुळे पालकांच्या खर्चावर मर्यादा आल्याने त्यांनी या कॉलेजांकडे पाठ फिरवली असली तरी हा बदल कायमस्वरूपी होणे आवश्यक आहे.
-डॉ. माधव राजवाडे, प्राचार्य,साठय़े कॉलेज, विलेपार्ले






























































