
सामना प्रतिनिधी । मुंबई
अकरावी ऑनलाइन नियमित प्रवेशप्रक्रिया संपली असूनही अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. आज जाहीर झालेल्या शेवटच्या यादीत ऑनलाइन अर्ज केलेल्या ८१,०६३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३२ हजार विद्यार्थ्यांना कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला नाही.
प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविली जाणार असून याची सविस्तर माहिती १० ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अल्पसंख्याक कोटय़ातील जागांसंबंधी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.
– शेवटच्या गुणवत्ता यादीत अर्ज केलेल्या एकूण ८१ हजार ६३ विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार ६२ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे. या विद्यार्थ्यांनी ९ ऑगस्टपर्यंत संबंधित कॉलेजमधून जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांन प्रवेश घेणे बंधनकारक असून २ ते १० पसंतीक्रमाचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घ्यावा लागणार आहे.
























































