पावसामुळे अकरावी प्रवेशाचे तीनतेरा, दुसरी गुणवत्ता यादी १३ ऐवजी १६ जुलैला

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुसळधार पावसाने अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे तीनतेरा वाजले आहेत. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी १३ जुलैला जाहीर होणार होती. पण पावसामुळे पहिल्या यादीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण न झाल्याने दुसरी यादी १६ जुलैला जाहीर होणार आहे. दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यास उद्या ११ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर कॉलेजना पहिल्या फेरीतील प्रवेश अपडेट व रद्द करून रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यासाठीही उद्या ११ जुलैपर्यंत मुदत आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ६ यावेळेत विद्यार्थ्यांनी दुसऱया गुणवत्ता यादीसाठी ऑनलाईन अर्जात कॉलेज पसंतीक्रम भरायचे आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले.

सुधारित वेळापत्रक
– १६ जुलै, सकाळी ११ वाजता – दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
– १६ ते १८ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – दुसऱया यादीनुसार प्रवेश
– १९ जुलै, सकाळी ११ वाजता – दुसऱया यादीचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर
-१९ ते २० जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ६ – तिसऱया यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरणे
– २३ जुलै, सकाळी ११ वाजता – तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
– २४ ते २६ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – तिसऱया यादीनुसार प्रवेश
– २७ जुलै, सकाळी ११ वाजता – तिसऱया यादीचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर
– २७, २८ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ६ – चौथ्या यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरणे
– ३० जुलै, सकाळी ११ वाजता – चौथी गुणवत्ता यादी जाहीर
– ३० जुलै ते २ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – चौथ्या यादीनुसार प्रवेश
– २ ते ४ ऑगस्ट – बायफोकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना संधी.