कधी कधी असंही घडतं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

डॉ. जी. माधवन नायर. इस्त्रोचे माजी अध्यक्ष. काही गोष्टींचा धुरळा उठला असला तरी कर्तृत्व नाकारता येत नाही.

31ऑक्टोबरला म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वी वयाची 76 वर्षें पूर्ण केलेल्या डॉ. जी. माधवन नायर याचं ‘इस्रो’चे अध्यक्ष आणि हिंदुस्थान सरकारच्या अवकाश विभागाच्या सचिव पदाची कारकीर्द वादग्रस्त रीतीनं संपली असली तरी हिंदुस्थानच्या अवकाश क्षेत्रांमधील विशेषतः अग्निबाणांच्या संदर्भातील त्यांचं कार्य हे लक्षणीयच ठरलंय. चंद्रयान-1 ही मोहीम त्यांच्या अवकाश आयोगाचे आणि इस्रेचे अध्यक्ष असतानाच यशस्वी झाली होती. अंतरिक्ष कॉर्पोरेशन, बंगळुरू या इस्रेच्या अधिपत्याखालील उपकंपनीचे ते अध्यक्ष होते. परंतु रेडिओ स्पेक्ट्रमच्या विक्रीशी संबंधित वादग्रस्त व्यवहारांशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांना आयआयटी पटनाच्या गव्हर्निंग बॉडीसहीत सर्व पदांचा त्यांना राजीनामा द्यायला लागून पुढे सर्व शासकीय पदांपासून त्यांना दूर ठेवण्याचं ठरविण्यात आले. डॉ. नायर यामध्ये ‘आपण निर्दोष’ असल्याचं ठासून सांगत असले तरी अद्यापि न्यायप्रविष्ट सुनवाई पूर्ण होऊन त्यांची मुक्तता झालेली नाही.

31 ऑक्टोबर 1943 मध्ये कुलसेखरम या कन्याकुमारी जिह्यातील गावात त्यांचा जन्म झाला. तेव्हा हे गाव गावणकोट संस्थानाचा भाग होते. तिरुअनंतपुरम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी केरळ विद्यापीठाची बीएस्सी (अभि.) पदवी 1966 साली संपादन केली. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन हे त्यांचं प्रावीण्य क्षेत्र होतं. त्यानंतर ते बीएआरसीच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. नायर हे अग्निबाणप्रणाली क्षेत्रातील प्रथितयश तंत्रज्ञ असून त्यांनी या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीमुळे हिंदुस्थानला मल्टिस्टेज उपग्रह प्रक्षेपण यानांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करता आली. ते म्हणतात, ‘जागतिक दर्जाची प्रक्षेपण प्रणाली प्राप्त करण्यासाठी विविध इनोव्हेशन्स आणि नावीन्यपूर्ण तंत्र विकसित करणं भाग होतं कारण तंत्रज्ञान नाकारण्याच्या त्या काळातील आव्हानपूर्ण वातावरणात याशिवाय दुसरा कोणता मार्ग नव्हता. आज हिंदुस्थानला उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा मान आहे. कारण आपण ते करून दाखवलंय. धृवीय उपग्रह प्रक्षेपण यानांच्या विकसनात प्रकल्प संचालक म्हणून मला हिंदुस्थानच्या पूरस्थ संवेदन उपग्रहांना प्रक्षेपित करण्याचा आनंद मिळाला. त्याचप्रमाणे विक्रम साराभाई अवकाश केंद्र तिरुअनंतपुरम या इस्रेच्या सर्वात मोठय़ा ‘आय ऍन्ड डी’ केंद्राचा संचालक म्हणून हिंदुस्थानच्या जीएसएलव्हीच्या विकासात मला योगदान देता आलं याचा मला रास्त अभिमान आहे. ‘डॉ. नायर लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचेही संचालक होते. तिथे त्यांना जीएसएलव्ही करता अत्यावश्यक असलेलं द्रवरूप इंधनावर चालणारं क्रायोजेनिक इंजिनची रचना आणि विकास प्रक्रियेत सहभागी होता आलं. अशी अनेक पद त्यांनी प्रामुख्यानं तिरुअनंतपुरम या ठिकाणीच भूषविली.

इस्रेचे अध्यक्ष झाल्यावर 2003 साली ते राष्ट्रविकासातील अवकाश तंत्रज्ञान आणि त्याच्या उपयोजनात भूमिका बजावण्याच्या जबाबदारीसाठी ते बंगळुरूला आले. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत इन्सॅट-3इ, रिसोर्ससॅट-1, एप्युसॅट, व्हार्टीलॅट-1, हॅमलॅट-1, इन्सेंट – 5, इन्सॅट – 4 बी, पीएसएलव्ही – सी 7, सीन्ड, जीएसएलव्ही – एफ-04, कार्टोसॅट 2ए, पीएसएलव्ही सी-1 आणि 10, चंद्रयान-1, पीएसएलव्ही-सी-11 आणि 12, तोरानसॅट-2, अनुसॅट यासारख्या एकूण 27 मोहिमा यशस्वी केल्या. अवकाशाचा ऑक्सिजन कमी खर्चात मिळावा आणि भविष्यातील तंत्रज्ञान सुलभपणे विकसित व्हावे याकरिता मी पुढाकार घेतला. अवकाश आयोगाचा अध्यक्ष या नात्यानं देशाच्या अवकाश संशोधनाबाबतचा भविष्यकालीन आराखडा तयार करताना मी ऍस्ट्रोसॅट आणि चंद्रयान मोहिमांसारख्या बाह्य-अवकाशीय मोहिमांद्वारे वैमानिक अन्वेषनामार्फत टेलीमेडीसीन, टेली-एज्युकेशन आणि आपत्ती व्यवस्थापन सहाय्यप्रणाली यावर भर दिला. समाजाच्या विकासात्मक गरजा भागविण्यासाठी प्रक्षेपण यान, संचार क्षेत्रासाठीची अवकाश यानं, दूरस्थ संवेदन आणि विविध उपयोजन कार्यक्रमांकरिता नवीन तंत्रज्ञान विकसनात त्यांनी मार्गदर्शन आणि नेतृत्व देण्याचं काम केलं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नायर यांनी हिंदुस्थानी शिष्टमंडळाचं नेतृत्व करून द्विपक्षीय सहकार्य आणि वाटाघाटींद्वारे फ्रान्स, रशिया, ब्राझीलसारख्या विविध देशांबरोबरच्या संबंधांना हातभार लावला.

डॉ. नायर यांचा फोकस नेहमी उच्च तंत्रज्ञानक्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करून अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे हिंदुस्थानच्या विकासाकरिता विशेषतः समाजातील ग्रामीण आणि गरीब लोकांना प्राप्त व्हावेच असा राहिलाय. देवास मल्टीमिडिया प्रा. लिमिटेड आणि अंतरीक्ष महामंडळातील 28 जानेवारी 2003 साली हस्ताक्षर करण्यात आल्याबद्दल जो वाद निर्माण झाला. त्यामुळे 25 जानेवारी 2012 पासून त्यांना शासकीय पदांपासून दूर ठेवण्याचं ठरले. परंतु त्यांनी अनेक पुरस्कार आणि पारिपोषिक प्राप्त केलीत ती त्यांच्या ज्ञानातील प्रावीण्यामुळे. यात नॅशनल एरोकॉटिक्स ऍवार्ड, फाय फाऊंडेशनचा पुरस्कार, ओमप्रकाश असीन पुरस्कार, एच. के. फिरोदिया ऍवार्ड, टिळक स्मारक ट्रस्टचा लोकमान्य टिळक पुरस्कार यासोबतच राजा राममोहन रॉय यांच्या 236व्या जयंतीनिमित्त राजा राममोहन पुरस्कार देखील प्राप्त केलाय. एवढंच नाही तर हिंदुस्थान सरकारनं 1998 साली पद्मभूषण आणि 2001 साली पद्मविभूषण हे सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविलं होतं. त्याचबरोबर त्यांना विविध विद्यापीठांनी मानद डी.फिल आणि डीएस्सी पदव्या देऊन गौरवन्वित केलंय.

डॉ. जी माधवन नायर विविध अकादमींचे सन्माननीय सभासद देखील आहेत. त्यात इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनियरिंग ऍस्ट्रॉललॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया इत्यादींचा समावेश आहे. ऑगस्ट 2017 मध्ये त्यांनी ‘अग्निपरिक्षाकाल’ या नावानं स्वतःचं आत्मचरित्र प्रकाशित केलंय. 2015 साली अमिटी विद्यापीठानं त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानीत केलंय. असे हे जी. माधवन नायर हिंदुस्थानच्या देदीप्यमान अवकाश इतिहासातील सध्या गडद ढगांच्या आच्छादनांमागे राहिलेला एक तेजस्वी तारा.