
8 जुलै हा डोंगरदऱयांमध्ये वसलेले गडकिल्ले हे तीर्थक्षेत्र मानून संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंतीसाठी खर्च करणाऱ्या गोनीदा म्हणजे गो.नी. दांडेकर यांचा जन्मदिवस. गोनीदांच्या 106व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्यावरील माहितीपटाचे आज लोकार्पण करण्यात आले. ‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ असे या माहितीपटाचे नाव असून तो आता यू-टय़ूबवर पाहता येईल.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने माहितीपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद भणगे यांचे आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न असलेल्या विविध जिल्हा संघटना आणि साहसी संस्था यांनी काही ठिकाणी माहितीपटाचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर आता यू-टय़ूबवर त्याचा आनंद घेता येणार आहे.
गोनीदांनी किल्ले भटकंतीतून दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शीवतीर्थ रायगड अशी सुंदर पुस्तके लिहिली. यातून वाचकांना दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रात डोंगर भटकंतीला दिशा मिळाली. गोनीदा किल्ले फक्त हिंडले नाहीत तर त्यांनी ते अनुभवले. गोनीदांचे दुर्गसंस्कार नवीन पिढीवर व्हावेत, या हेतूने माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
गोनीदांचा जीवनप्रवास, त्यांची साहित्यरचना, फोटोग्राफी, संगीताची त्यांना असलेली आवड, विविध मुलाखती, दिग्गजांसोबत केलेले गडदर्शन आदींचा ऊहापोह माहितीपटात आहे.




























































