मोदींच्या इंग्रजीवर ट्रम्प फिदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओघवत्या भाषणशैलीमुळे हिंदुस्थानसह परदेशात लोकप्रिय बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्तुती केली. मोदींचे इंग्रजी खूप चांगले आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांच्या तोंडून कौतुकाचे बोल बाहेर पडताच ट्रम्प-मोदी यांच्यासह सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू तरळले.

फ्रान्समधील जी-7 परिषदेदरम्यान ट्रम्प आणि मोदी हे दोघे एकत्र प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. दोघांच्या भेटीत कश्मीरच्या गंभीर मुद्दय़ावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती, मात्र या मुद्दय़ावर  दोघांनी बोलणे टाळून हलक्या-फुलक्या विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रसारमाध्यमांनी मोदी यांना कश्मीरच्या मुद्दय़ावर प्रश्न केला. त्यावर मोदी म्हणाले, याबाबत आम्हाला दोघांना चर्चा करू द्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्यापर्यंत या चर्चेची माहिती पोहोचवू. याचदरम्यान ट्रम्प यांनी मोदी यांच्या इंग्रजीची प्रशंसा केली. मोदी खूपच चांगले इंग्रजी बोलतात, परंतु आता ते या विषयावर बोलू इच्छित नाहीत, असे कौतुकाचे बोल ट्रम्प यांच्या तोंडून बाहेर पडताच सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू तरळले.