
गडचिरोली जिल्ह्यातील दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. मंगल कुडयामी आणि मदनया उर्फ सूर्या तलांडी अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. मंगलू हा सध्या छत्तीसगढ येथील सेन्ड्रा दलममध्ये तर मदनया हा बिजापूरमधील जनमिलिशिया कंपनी दलममध्ये कार्यरत आहे.
9 फेब्रुवारी रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात प्राणहिता येथील सी-60 च्या पथकाने भंगाराम पेठा व कुर्ता घाट या जंगल परिसरात संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवितांना या दोघांना ताब्यात घेतले. मंगलू कुडयामी 2018 पासून दलम मध्ये कार्यरत असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर मदनया हा 2005 पासून नक्षल चळवळीत कार्यरत असून तो सुरुवातीला सेन्ड्रा दलममध्ये कार्यरत होता. आता तो सध्या जनमिलिशिया दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावरही चकमकी व अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनीं गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.




























































