भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून द्या – गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

शुध्द आणि भेसळरहीत अन्न हा सामान्यांचा अधिकार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून द्यावेत. प्रसारमाध्यमातून दोषींचे फोटो प्रसिद्ध करावे, त्यामुळे अपप्रवृत्तीला जरब बसेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा तसेच इमारतीचे भूमिपूजन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अन्न व औषध प्रशासनाने जनतेला वेळेत व ऑनलाईन सेवा द्याव्यात. अनेक वर्षापासूनची या प्रयोगशाळेसाठी असलेली मागणी पुर्ण होत आहे. पाश्चिमात्य देशात अन्न व औषधांना देण्यात येणारे उच्चमूल्य या विभागाने द्यावे तसेच मोठ्या उद्योजकांनीही अन्नशुध्दीला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.

अन्न व औषध प्रशासन हा विभाग सामान्यांशी जुळलेला आहे. गेल्या वर्षभरात १५० कोटी रूपयांचा गुटखा विभागाने जप्त केल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. जुन्या कायद्यातील त्रुटीवर अभ्यास करून अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करणारा कायदा मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शुध्द अन्न सामान्यांना मिळावे म्हणून कायद्यासोबतच प्रबोधन सुध्दा गरजेचे आहे, ते म्हणाले. दुधात होणारी भेसळ ही चिंताजनक असून भेसळ करणाऱ्यांना नवीन कायद्यात कमीतकमी तीन वर्षे एवढ्या शिक्षेची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.

जनतेला सकस व शुध्द अन्न मिळण्यासाठी विभागामार्फत राज्यात अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील ही तिसरी प्रयोगशाळा आहे. जनतेला चांगली सेवा देण्यासाठी या अद्ययावत प्रयोगशाळेची मदत होईल, असे राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात सुसज्ज वास्तु तयार होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके विभागातर्फे अन्न सुरक्षेवर काढलेल्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.