है तय्यार हम…‘मिशन गगनयान’साठी हिंदुस्थानी अंतराळवीर सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हिंदुस्थानच्या ‘मिशन गगनयान’साठी हिंदुस्थानी अंतराळवीर सज्ज झाले आहेत. हिंदुस्थानी वायुदलाच्या चार अधिकाऱयांनी यासंदर्भातील विशेष प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. रशियाची राजधानी मॉस्को येथील स्पेस ट्रेनिंग सेंटरमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून या कामगिरीचे देशभरात कौतुक केले जात आहे.

हिंदुस्थानच्या ‘मिशन गगनयान’साठी इस्रो आणि रशियाच्या ग्लवकॉस्मॉस यांच्यात 2019 मध्ये एक विशेष करार करण्यात आला होता. या कराराअंतर्गत हिंदुस्थानी वायुदलातील चार पायलट्सना गैगरीन येथे विशेष प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या चारांमध्ये एक ग्रूप कॅप्टन आणि तीन विंग कमांडरचा समावेश होता. 10 फेब्रुवारी 2020 रोजी हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते. कोरोनामुळे या प्रशिक्षणास स्थगिती देण्यात आली होती. नंतर पुन्हा 12 मेपासून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते, जे नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

आता हिंदुस्थानात होणार प्रशिक्षण

वायुसेनेच्या ज्या चार अधिकाऱयांचे प्रशिक्षण मॉस्को येथे पूर्ण करण्यात आले आहे त्यांचे लवकरच बंगळुरू येथे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. ‘इस्रो’च्या वतीने या ठिकाणी विशेष मॉडय़ुल तयार करण्यात आले असून या विशेष मॉडय़ुलमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे.

‘मिशन गगनयान’ला लेटमार्क

देशभरचे लक्ष लागून राहिलेल्या या ‘मिशन गगनयान’साठी ‘इस्रो’तर्फे प्रथम डिसेंबर 2021चा मुहूर्त ठरविण्यात आला होता. तर मानवरहित मिशनसाठी डिसेंबर 2020 आणि जुलै 2021ची वेळ ठरविण्यात आली होती. पण हे दोन्ही मुहूर्त पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी ‘मिशन गगनयान’ची घोषणा केली होती. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून चार अंतराळवीर या मोहिमेवर जाणार असून तब्बल सात दिवस ही मोहीम चालणार आहे.