
सामना प्रतिनिधी । अलिबाग
वाढीव मोबदल्यातील फुटकी कवडी 23 वर्षांनंतरही न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरशः तांडव केले. आश्वासने कसली देताय.. ‘गेल’ प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे.. सहनशक्तीचा अंत पाहू नका, अशा जोरदार घोषणा देत या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना फैलावरच धरले. त्यामुळे आश्वासनांच्या नावाखाली वेळकाढूपणा करणाऱ्या सरकारी बाबूंची पळताभुई थोडी झाली. एमआयडीसी व जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्याने 154 शेतकऱ्यांची गेली अनेक वर्षे फरफट सुरू आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर, कुणे, मल्याण, खानाव परिसरातील ‘गेल’ प्रकल्पासाठी 1981 मध्ये 196 हेक्टर जमीन कवडीमोल भावाने एमआयडीसीने संपादित केली होती. यापैकी काही भूखंडांवर गॅस ऍथोरिटी ऑफ इंडियाचा प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी दोन रुपये 57 पैसे प्रति चौरस मीटर दर देण्यात आला. मात्र वाढीव मोबदल्यासाठी 154 खातेदारांनी 23 वर्षे लढा दिला आहे. दरम्यान न्यायालयाने या सर्व शेतकऱ्यांना प्रतिचौरस मीटर 12 रुपये वाढील मोबदला देण्याचे आदेश देऊनही तांत्रिक कारण पुढे करून प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे संयमाचा बांध फुटलेल्या रामचंद्र दळवी यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणा दिल्या. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आलोय.. सहनशक्तीचा अंत पाहू नका.. अन्यथा सरकारला धडा शिकवू, असा इशारा दिला.
रोजगारही बुडाला
गॅस ऍथोरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्पामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले. प्रकल्पावर आधारित स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मंदीमुळे जवळपास हा प्रकल्पच बंद पडला आहे. त्यामुळे रोजगार बुडाला असून वाढीव मोबदलाही देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.



























































