खेळ आता सुरू झालाय…संजय राऊत यांचे सूचक ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळ आता सुरू झालाय.. थोडे थांबा आणि वाट पहा, असे सूचक ट्विट करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवून देण्याचे सूतोवाच केले आहे. 15 फेब्रुवारीला मुंबईत शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून खासदार राऊत यांनी सनसनाटी आरोप करत राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवली होती.

केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी दलालांच्या माध्यमातून काम करतात. तपास यंत्रणांचे अधिकारी पक्षपातीपणाने कारवाई करतात. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच केला होता. केंद्रीय तपास यंत्रणा अधिकारांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना जाणीवपूर्वक वेठीस धरतात. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी वसुली एजंटस् नेमलेले आहेत. त्यांच्यामार्फत हा गोरखधंदा सुरू आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला होता.

केंद्रीय तपास यंत्रणांचा एकंदरीत पक्षपाती कारभार, वसुली एजंटस्चे कारनामे, काही अधिकारी कशा पद्धतीने वसुली प्रकरणात गुंतलेले आहेत, महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी घातलेला हैदोस, यासंदर्भातील सबळ पुरावे सोमवारी खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केले.

जे काही पुरावे सादर केले त्याचा तपशील देण्यासाठी लवकरच सविस्तर पत्रकार परिषद घेणार असून तोवर थांबा आणि वाट पहा, असे सूचक ट्विट खासदार राऊत यांनी केल्याने संजय राऊत आता कोणता भंडाफोड करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.