
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर गणपती उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जात असताना आता रेल्वेनेही येत्या रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचे जाहीर केल्याने मुंबईकरांना तर बाप्पाच पावला आहे. कारण रविवारी सुट्टीच्या दिवशी गणपती पाहण्यासाठी आणि नातलगांच्या भेटीगाठीसाठी कुटुंबकबिल्यासह बाहेर पडलेल्या मुंबईकरांना लोकलमधून बिनधास्त फिरता येणार आहे. मध्य रेल्वेने येत्या रविवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी मुंबईतील कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाहीये, अशी माहिती ट्विट करीत दिली आहे. येत्या रविवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार असल्याने मुंबईतील सर्व चौपाटय़ांवर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. त्यामुळे जर मेगाब्लॉक घेतला तर याचा फटका प्रवाशांना बसू शकतो आणि हीच बाब लक्षात घेत मध्य रेल्वेने येत्या रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

























































