गांधीनगरमधील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, करवीर शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे येथील होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तयार कपडय़ांची बाजारपेठ असलेल्या गांधीनगर परिसरातील होर्डिंग्जचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिटसह संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नोंद ठेवण्यात यावी, अशी मागणी करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन करवीरचे नायब तहसीलदार बिपीन लोकरे यांना देण्यात आले.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, पोपट दांगट, विक्रम चौगुले, दीपक रेडेकर, राहुल गिरुले, शरद माळी, वीरेंद्र भोपळे, योगेश लोहार, अजित चव्हाण, बाळासाहेब नलवडे, सचिन माळी, सचिन नागटिळक, मनोज कुरळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठेसह सर्वच वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ असून, तावडे हॉटेलपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोकळ्या जागेत तर काही ठिकाणी दुकानांच्या इमारतीवर जाहिरातींचे फलक मोठय़ा प्रमाणात लावलेले आहेत. या मार्गावर प्रचंड प्रमाणात गर्दी असते, दुकानातही हजारो कामगारांसह ग्राहकांची गर्दी असते.

वादळी वाऱयामुळे कोणताही अपघात होऊ नये, याची खबरदारी म्हणून संबंधित जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासह त्यांची नोंद ग्रामपंचायतमध्ये असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला त्याद्वारे उत्पन्नही मिळू शकते. तसेच जाहिरात फलकाचा दर्जाही तपासणीत समजू शकतो, असे नमूद करून वादळी वाऱयामध्ये जर काही अपघात झाला, तर संबंधित दुकानमालकासह त्या हद्दीतील ग्रामपंचायतीवर अपघाताचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी निवेदनात केली. जर दुर्घटना घडली तर प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी लवकरच फलकांचे ऑडिट करून, बेकायदेशीर फलकांवर योग्य त्या कारवाईसाठी पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायतींना कळवू, असे आश्वासन नायब तहसीलदार लोकरे यांनी दिले.