
>> गणेश आचवल
सध्या सोनी मराठी वाहिनीवर ‘जिवाची होतिया काहिली’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेत प्रताप ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अनुप बेलवलकर… एक प्रॉमिसिंग चेहरा.
अनुपचे जन्मगाव सावंतवाडी. त्याचे शालेय शिक्षण सांगलीमधील मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. कॉलेजला असताना विविध एकांकिका स्पर्धा, युथ फेस्टिवल्स यामध्ये त्याचा आवर्जून सहभाग असे. अनुपने प्रायोगिक नाटकांतदेखील भूमिका केल्या होत्या. मुंबई दूरदर्शनवर ‘सावित्रीच्या लेकी’, ‘डायल 100’ तसेच स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’मध्येदेखील त्याची भूमिका होती. ‘जीव झाला येडा पिसा’ यामधील त्याने साकारलेली विद्यासागर व्यक्तिरेखा तसेच झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ या रहस्यमय मालिकेतील त्याने साकारलेली अभय ही भूमिका विशेष लक्षात राहिली. अनुपने ‘आभाळाची माया’ मालिकेत खलनायकदेखील साकारला होता. त्याने सांगली आकाशवाणी केंद्रावर रेडिओ अनाऊन्सर म्हणून दहा वर्षे काम केले आहे.
सोनी मराठीवरील ‘जिवाची होतिया काहिली’मधील भूमिकेबद्दल अनुप सांगतो, ‘‘मी यात तात्यासाहेब रांगडे पाटील यांच्या मोठय़ा नातवाची म्हणजे प्रतापची व्यक्तिरेखा साकारत आहे. या प्रतापची स्वप्नं खूप आहेत, पण ती पूर्ण झालेली नाहीत. त्याचे आजोबांवर खूप प्रेम आहे. त्याच्या बायकोला घराचे विभाजन हवे आहे, पण तो त्याला स्पष्टपणे विरोध करतो. असे व्यक्तिरेखेचे विविध पैलू साकारताना खूप शिकता आले. त्याचप्रमाणे या मालिकेमुळे अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करता आल्याने खूप शिकता आले.’’
‘संत गजानन शेगावीचे’ या मालिकेत एका कलेक्टरची भूमिका तो करत आहे. हा कलेक्टर बायकोपुढे हतबल झालेला दाखवला आहे. अनुपने त्याच्या या करीअरमध्ये अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.




























































