
राज्यभरात गणेशोत्सावाला उत्साहात सुरुवात झाली आहे. देशात मंदीचे सावट असूनही भाविकांनी ढोल- ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले आहे. सार्वजनिक मंडळांसह अनेक घरातही परंपरेप्रमाणे गणेशाची स्थापना करण्यात आली.

नगरमध्ये ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात पोलिस अधिक्षकांच्या हस्ते पुजा
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदीरामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. नगर जिल्हयात साधारणता 2500 मंडळांनी नोंदणी केली आहे. शहरामध्ये 221 मंडळांना ऐनवेळी परवानगी देण्यात आल्या होत्या. नगर शहरामध्ये विविध सार्वजनिक मंडळांनी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात गणरायांची स्थापना केली. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत नेता सुभाष तरुण मंडळाच्या वतीने गणरायाचीं स्थापना करण्यात आली.

राजुरेश्वरमध्ये 20 हजार गणेशमूर्तींची विक्री
राजुरेश्वराच्या पायथ्याशी थाटलेल्या दुकानांमधून 20 हजार गणेशमूर्तींची विक्री झाली आहे. मराठवाड्यातील अनेक भाविक घरी व सार्वजनीक ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यासाठी गणेश चतुर्थीला श्रीक्षेत्र राजूर येथूनच ‘श्री’ ची मूर्ती खरेदी करतात. राजुरेश्वरातून घेऊन गेलेल्या गणपतीची स्थापना केल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. छोट्या गणपतीपासून ते 15 फुटापर्यंत गणपती विक्रीसाठी आले होते. तर 51 रूपयांपासून ते 10 हजारापर्यंत गणपतीच्या किंमती होत्या. 15 क्विंटल रांगोळींची विक्री झाली असून सजावटीच्या साहित्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. राजुरेश्वराच्या मंदिरात दिवसभर धार्मिक कार्याक्रमांची रेलचेल होती. ढोल ताशांच्या गजरात राजुरेश्वराची मंत्रोउच्चारात महापूजा करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी व विश्वस्त मंडळाच्या हस्ते ‘श्री’ चा अभिषेक व महाआरती करण्यात आली आहे.

हिंगोलीत गणरायाचे उत्साहात स्वागत
सध्या देशात मंदीचे सावट असूनही भक्तांनी श्री गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात शहरासह जिल्हाभरामध्ये स्वागत केले. विविध गणेश मंडळांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण व ढोल-ताशाच्या गजरात गणरायाची स्थापना केली. हिंगोली शहरातील गांधी चौक भागामध्ये गणेश मुर्ती घेऊन जाण्यासाठी सकाळी 8.30 वाजेपासुन नागरिकांसह बच्चे वंâपनीनी गर्दी केली होती. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, आखाडा बाळापुर, जवळाबाजार, सेनगाव, औंढा नागनाथ, गोरेगाव, कनेरगाव नाका, नर्सी नामदेव, साखरा, सिरसम, वारंगा फाटा, डोंगरकडा यासह विविध गावांमध्ये व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीची स्थापना केली. गणपती मंडळाच्या वतीने भव्य मंडप ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. तसेच आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली.

हिंगोलीत श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या पालखीचा उत्साह
देशभरात प्रसिध्द असलेल्या हिंगोली शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराच्या पालखी मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशा पथक, अश्व पथक, वारकरी व श्री गणेश भक्तांनी पारंपारिक वेशभूषेत भगवी पताका हातामध्ये घेऊन ही मिरवणूक काढली. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मंदिरात पोहचल्यावर श्रीची स्थापना करण्यात आली. तसेच महापुजा, महाआरती करुन नैवद्य दाखविण्यात आला.



























































