मोकळे भूखंड, खेळाच्या मैदानांवर तात्पुरते मंडप उभारण्यास मुभा द्या, मुंबईतील गणेश मूर्तिकारांच्या समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील मूर्तिकारांना दुर्गामाता आणि गणरायाच्या मूर्ती घडविण्यासाठी त्या-त्या विभागातील पालिकेचे मोकळे भूखंड तसेच खेळाच्या मैदानांवर तात्पुरते मंडप उभारण्यास मुभा द्यावी, अशी मागणी श्री गणेश मूर्तिकला समितीने मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. दोन वर्षांपूर्वी बोरिवलीतील पदपथावर उभारलेल्या मूर्तिशाळेमध्ये कार घुसली होती. त्या घटनेचा संदर्भ देत समितीने पादचाऱ्यांच्या गैरसोयीचाही मुद्दा उपस्थित केला आहे.

मुंबईतील श्री गणेश मूर्तिकला समितीचे अध्यक्ष वसंत राजे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. उच्च न्यायालयाने 3 ऑगस्ट 2015 रोजी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने सण-समारंभासाठी रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतचे धोरण तयार केले. त्यात पादचाऱ्यांना प्राधान्य निश्चित केले आहे. पादचाऱयांना वाहनांच्या गर्दीतून चालण्यास भाग न पडता पदपथांवरून मुक्तपणे चालता यावे, असे पालिकेचे धोरण असल्याचे समितीने म्हटले आहे. याचवेळी 10 ऑक्टोबर 2023 रोजी बोरिवलीतील मोकळय़ा पदपथावर अधिकृत मंडप उभारलेल्या मूर्तिकार प्रवीण देसाई यांच्याबाबतीत घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. मध्यरात्री एक भरधाव कार मूर्तिशाळेच्या आत घुसली आणि मंडप तुटून किमान सात ते आठ लाखांचे नुकसान झाले होते. सुदैवाने जीवितहानी टळली होती. परवानगी घेऊन तात्पुरता मंडप उभारणाऱया कोणत्याही मूर्तिकारासोबत तशी घटना घडू नये आणि पदपथावर पादचाऱयांनाही मुक्तपणे चालता यावे, या हेतूने यापुढे मूर्तिकारांना सार्वजनिक पदपथ वा रस्त्यांऐवजी विभागातील पालिकेचे मोकळे भूखंड, खेळाची मैदाने अशा सोयीच्या जागी तात्पुरते मंडप उभारण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती श्री गणेश मूर्तिकला समितीतर्फे करण्यात आली आहे.