
कोरोनाचे जागतिक संकट दूर करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस यंत्रणा 24 तास लढत आहे. तसेच कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या रक्षणासाठी अनेक कोरोना योद्धे झटत आहेत. या कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिकच्या टेक्श्चर आर्टच्या मूर्तीकारांनी अनोखी कल्पना राबवली आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त नवनव्या रूपात गणेशमूर्ती साकारणार्या नाशिकच्या योगेश टिळे या मूर्तीकाराने यंदा शाडू मातीपासून डॉक्टर आणि पोलीस यांच्या गणवेशातील गणरायाची मूर्ती घडविली आहे. कोरोनाचे विघ्न लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करीत कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आपला हा प्रयत्न असल्याचे योगेश टिळे यांनी सांगितले.
टेक्श्चर आर्ट सोल्यूशनचे संचालक योगेश टिळे व योगेश पाळदे यांनी गेल्यावर्षी दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हेल्मेट बाप्पा साकारले होते. ती मूर्ती मागील वर्षी लक्ष वेधून घेणारी ठरली. यावर्षी मार्चपासून जगावर कोरोनाने संकट आले आहे. कोरोनाविरोधात डॉक्टर आणि पोलीस आघाडीवर राहून लढत आहेत. त्यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून टिळे यांनी श्रीगणेशाची मूर्ती डॉक्टर व पोलीस यांच्या गणवेशात साकारली आहे. मूर्तीच्या पाटावर ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ आणि ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे या विभागाचे ब्रिदवाक्यही लिहिले आहे. ही मूर्ती आकर्षक आहे. या प्रकारच्या एक ते दीड फुटांच्या बारा मूर्ती त्यांनी शाडू मातीत घडवल्या आहेत. त्यांनी पावणेदोन फुटी मूर्ती नुकतीच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे. पोलीस आयुक्तालयात या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोना योद्ध्यांच्या रूपातील या मूर्तीला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मूर्तीची किंमत सुमारे साडेचार हजार रुपये इतकी आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यंदा कारागीर मिळाले नाही. जे कारागिर आले, त्यांनाही सुमारे अडीच हजार रुपये रोज द्यावा लागला. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजे अवघ्या चारशे मूर्ती तयार करता आल्या, असे त्यांनी सांगितले. म्हैसुरी फेटा, पेशवाई फेटा घातलेल्या व इतर 30 प्रकारच्या 8 इंच ते 2 फुटांपर्यंत शाडू मातीच्या मूर्ती त्यांच्याकडे आहेत. नैसर्गिक आणि ऍक्रॅलिक रंगांचा वापर करून साकारलेले गणरायाचे देखणे रूप सर्वांनाच आकर्षित करणारे आहे.




























































