परवानगीतील विघ्न टाळण्यासाठी मंडळ प्रशासनाचा व्हॉटसअप ग्रुप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी मंडळांना 4 जुलैपासून अर्ज करता येत असताना मुंबईतील 12 हजार मंडळांपैकी आतापर्यंत केवळ 373 मंडळांनीच परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातील फक्त 112 मंडळांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली असून 26 अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाला अवघे 40 दिवस राहिल्याने मंडळांची तांत्रिक अडचणींमुळे परवानगीसाठी गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रशासन आणि मंडळांचा ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्यात आला, मात्र या वर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने गणेशोत्सव धूमधडाक्यातच साजरा होणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया गणेशोत्सवासाठी मंडळांची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. पालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र काही मंडळांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. त्यामुळे सर्व 24 वॉर्डच्या सर्व मंडळांचा समावेश असलेला स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावा अशी मागणी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत समन्वय समितीकडून करण्यात आली होती. याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंतची स्थिती

आलेले एकूण अर्ज – 373
डबल आलेले अर्ज – 35
पडताळणीत असलेले – 338
परवानगी दिलेली संख्या – 112
परवानगी नाकारली – 26
प्रक्रियेत असणारे अर्ज – 200

घाटकोपरमध्ये अद्याप एकही परवानगी नाही

मुंबईत ‘एन’ विभाग घाटकोपरमध्ये परवानगीसाठी अर्ज केलेल्या 23 अर्जांपैकी आतापर्यंत एकाही मंडळाला परवानगी मिळाली नसल्याचे समन्वय समितीचे सहकार्यवाह ओमकार सावंत यांनी सांगितले.
ऑनलाइन आलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी या ठिकाणी असलेल्या पंत्राटदाराचा कालावधी संपल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत उपलब्ध कर्मचारीच परवानगीच्या अर्जांबाबत कार्यवाही करीत आहेत. मात्र यामुळे परवानग्या रखडत असल्याचेही ते म्हणाले.