
कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. या सणासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवास सुखद व्हावा यासाठी गणेशोत्सवांदरम्यान महामार्गावरील परशुराम घाट 24 तास खुला ठेवण्यात यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. गेले काही दिवस परशुराम घाट रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याने महामार्गावरून जाड वाहने हाकणाऱ्या चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट अतिशय धोकादायक मानला जातो या घाटातील तीव्र उतार, नागमोडी वळणे, एका बाजूला असलेली खोल दरी तर दुसऱ्या बाजूला कधीही खाली येईल असा डोंगर यामुळे परशुराम घाटात वाहने हाकताना चालकाचा कस लागतो. पावसाळ्यात तर या घाटातील धोका आणखीनच वाढतो. गतवर्षी 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान परशुराम घाटाचा काही भाग खचल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागला होत्या. अनेक वाहने महामार्गावरच अडकून पडली होती.
पावसाळ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत यावर्षी परशुराम घाटाच्या चौपदरीकारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात सुरु झालेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा ठेकेदार कंपनीचा प्रयत्न होता. काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी 25 एप्रिल ते 25 मे या दरम्यान परशुराम घाट दुपारी 12 ते सायंकाळी 7 या दरम्यान रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. काहीही करून पावसाळ्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण करायचेच या दृष्टीने यंत्रणा कामाला लागल्या होत्या मात्र पावसाळा सुरु झाला तेव्हा 40 टक्के देखील काम पूर्ण झाले नव्हते त्यामुळे परशुराम घाटातून प्रवास करणे अधिकच धोकादायक झाले होते.
दरम्यान परशुराम घाटात दरड रस्त्यावर आली आणि हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे घाटातील वाहतूक आंबडस – चिरणी मार्गे वळविण्यात आली. मात्र हा रस्ता अरुंद आणि धोकादायक असल्याने हा मार्ग केवळ हलक्या वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला. त्यामुळे परशुराम घाटाच्या दोन्ही बाजूला मालवाहू ट्रक, आराम बसेस, कंटेनर यासारख्या जड वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या, अनेक दिवस वाहने जागची न हल्ल्यामुळे चालक आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले. महामार्गावर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत सकाळी 6 ते सायंकाळी 7 या दरम्यान परशुराम घाट जड वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे आजही रात्री घाटाच्या दोन्ही बाजूला जड वाहनांच्या रांगा लागत आहेत.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात येणारे बहुतांशी चाकरमानी आपल्या स्वतःच्या किंवा भाड्याची वाहने घेऊन येत असल्याने या दरम्यान महामार्गावरील रहदारी कमालीची वाढणार आहे. या दरम्यान देखील परशुराम घाट रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात आला तर गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा तर होणार आहेच शिवाय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परशुराम घाट दिवस-रात्र सुरू ठेवून चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.





























































