
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तीपर गाण्यांचे, अल्बमचे प्रकाशन होत असते.
नुकतेच गायक नकाश अझीझचे ‘मोरया’ गाणे प्रदर्शित झाले असून ते ‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ ची प्रस्तुती आहे. ‘मोरया’ गाण्यातून गणेशभक्ताने आर्त भावनेने गणरायाला वंदन करत साद घातली आहे. गणरायाचे आगमन झाल्यानंतर गणेशभक्तांच्या चेहऱयावरून ओसंडून वाहणारा आनंद या गाण्यात पाहायला मिळतोय. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसाद शिंदे यांचे आहे. यंदाच्या उत्सवात गणेशभक्तांसाठी ही सुरेल भेट आहे.
सोनाली पाटील म्हणते ‘मोरया’
गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सप्तसूर म्युझिकने ‘मोरया’ म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. यामध्ये मराठी बिगबॉस फेम सोनाली पाटील आणि पंटेट क्रिएटर धनंजय पोवार दिसतील. या दोघांव्यतिरिक्त पार्थ पेंद्रे, अमन कांबळे, समरवेर शाह, राजवीर पावसकर यांचाही या म्युझिक व्हिडिओमध्ये सहभाग आहे. दमदार शब्द, ताल धरायला लावणारे संगीत, देखणे छायाचित्रण ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्टय़े आहेत. स्टिवन पोल्स यांनी दिग्दर्शित केलेल्या या म्युझिक व्हिडिओचं गीतलेखन, संगीत आणि गायन विकी वाघ यांनी केले आहे.