
सामना ऑनलाईन । नगर
शहरातील नेता सुभाष चौकात उभारण्यात आलेला गणेशोत्सवाचा मंडप महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केला. या घटनेमुळे नगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करीत शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली असून उपनेते राठोड यांनी नेता सुभाष चौकात उपोषण सुरू केले आहे. दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा राठोड यांनी घेतला आहे.
गेल्या 40 वर्षांपासून नेता सुभाष चौक मित्रमंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी मंडळाने 29 ऑगस्टला महापालिकेकडे रीतसर अर्ज केला होता, मात्र महापालिकेने अद्यापि परवानगी देण्यास सुरुवात केली नाही असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मंडप उभारण्याचे काम सुरू केले. ही बाब लक्षात येताच काल रात्री कोतवाली आणि तोफखान्याचे पोलीस पाहणी करून गेले. त्यानंतर शिवसेना उपनेते राठोड आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यात बोलणे झाले होते.
दरम्यान, सकाळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्राजित नायर व अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने नेता सुभाष चौकातील मंडप उद्ध्वस्त केला. यावेळी उपनेते राठोड यांनी कारण विचारल्यानंतर नायर यांनी एकेरी भाषा वापरल्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनिल राठोड यांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली.
नायर यांची अरेरावी
गणेशोत्सव मंडपावर कशाच्या आधारे कारवाई करता, असा प्रश्न शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी करताच प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी नायर यांनी अरेरावी सुरू केली. ही बाब प्रशासनाला शोभत नाही. हे अधिकारी केरळमधून आल्याने त्यांना हिंदूंच्या सणाबद्दल आक्षेप असल्याचा आरोप अनिल राठोड यांनी केला.
प्रशासनाला शांतता बिघडवायची आहे – राठोड
गणेशोत्सवासाठी उभारलेला मंडप प्रशासनाने तोडला असून ही बाब गंभीर आहे. यामागे भाजपचे षड्यंत्र असून दादागिरी करून प्रशासनाला शहराची शांतता बिघडवयाची आहे असा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला. प्रशासनाची अशीच भूमिका असेल तर यापुढील काळात रस्त्यावरच गणपती बसवला जाईल असा इशारा राठोड यांनी दिला.


























































