गणपती बाप्पा मोरया, चाकरमान्यांनू खड्डे मोजत या!

सामना ऑनलाईन, मुंबई

पनवेल-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली चाललेली हळुवार मलमपट्टी आणि रस्त्यावर पडलेले लाखो खड्डे पाहता रविवार 9 तारखेच्या आधी महामार्गावरील खड्डे बुजविणे अशक्यच आहे. यामुळे गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची आजपर्यंत जेवढी रखडपट्टी झाली नाही तेवढी यंदा होणार आहे. परिणामी या मार्गावरून सावंतवाडीपर्यंत जाण्यास 20 तासांहून अधिक तास लागणार आहेत.

गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी पनवेल-गोवा महामार्गाची आठवण चाकरमान्यांना आणि राज्यकर्त्यांना होते. यंदाही ती झाली आणि राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील महामार्गाने तडक कुडाळच्या झारापपर्यंत पोहोचले. यावेळी अनेक राज्यकर्त्यांनी पाटील यांची गाडी अडवून खड्डे कधी बुजविणार, असा जाब विचारला आणि 9 सप्टेंबरपूर्वी खड्डे बुजविणार असे सांगून पाटील यांनी आपला मार्ग मोकळा केला. पण खरोखरच महामार्गावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजणार का, असा प्रश्न सध्या चाकरमान्यांसमोर निर्माण झाला आहे.

सध्या पनवेल-झाराप या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. एकूण 14 ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. त्यादृष्टीने वेगही घेतला आहे. पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते पोलादपूर या मार्गाचे गेली सहा वर्षे रखडलेल्या कामामुळेच पनवेल-गोवा महामार्गाचा पुरता चुराडा झाला. हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असता; परंतु आता थेट झारापपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे जुन्या महामार्गावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे लाखाहून अधिक आहेत. त्यात जागोजागी पडणारा पाऊस पाहता पुढील चार दिवसांत म्हणजे 9 सप्टेंबरपूर्वी हे खड्डे भरणे निव्वळ अशक्यच आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या सूचनेनुसार ठेकेदारांनी संगमेश्वर, चिपळूण, लांजा अशा ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवातही केली आहे, पण पडणारा पाऊस पाहता बुजवलेले खड्डे कितपत तग धरतील हा प्रश्नच आहे. एकंदरीत दरवर्षीपेक्षा यंदा चाकरमान्यांची सॉलीड रखडपट्टी होणार. सावंतवाडीपर्यंत पोहोचण्यास 20 तासांहून अधिक वेळ लागणार.

हॉटेल्सना अखेरची संधी

महामार्गाचे चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम व त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे चाकरमान्यांची पुरती रखडपट्टी  होणार असली तरी याचा फायदा महामार्गावरील हॉटेलमालकांना होणार आहे. लाखो लोकांची न्याहारी, जेवण, पाणी आणि चहा-बिस्किटांची चोख व्यवस्था या हॉटेलचालकांना अहोरात्र करावी लागणार आहे. कारण ही अखेरची संधी त्यांना मिळणार आहे. पुढील वर्षी महामार्गाचे काम 60 टक्क्यांहून अधिक पूर्ण होणार व गाडय़ा वेगाने पुढे सरकणार.

मुंबई-पुणे-कोल्हापूर जाम होणार

मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारी रखडपट्टी पाहता सिंधुदुर्ग जिह्यासह लांजा, राजापूरमधील सर्व चाकरमानी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गाने प्रवास करण्याची शक्यता आहे. या मार्गावर जागोजागी असलेले टोलनाके आणि लोणावळा, खंबाटकी घाट पाहता या मार्गावरही वाहतुकीची कोंडी होणार आहे.