
>> रश्मी वारंग
विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने घरोघरी आनंदाच्या सरी बरसत आहेत. हाच आनंद व्यक्त करणारे पांढरेशुभ्र आनंदनिधान म्हणजे आपला लाडका मोदक. या मोदकांची ही गोड गोष्ट. ‘मोदक’ या शब्दातच त्याचं स्वरूप स्पष्ट होतं. जो मोद, आनंद घेऊन येतो तो मोदक.
मोदकांचं बाप्पाशी नातं कसं जुळलं? हे सांगणाऱया अनेक कथा आहेत. त्यापैकी पद्मपुराणामध्ये सांगितलेली एक कथा अशी की, पुराणकाळात देवीदेवतांनी अमृतापासून बनवलेला दिव्य मोदक देवी पार्वतीला देऊ केला. देवी पार्वतीचे दोन पुत्र स्कंद आणि गणेश त्या मोदकास पाहून भुलले. हा दिव्य मोदक आपल्यालाच मिळावा असा हट्ट करू लागले. पार्वतीने त्या दोघांनाही मोदकाचे महात्म्य सांगितले आणि जो पुत्र धर्माचरणात श्रेष्ठता बाळगेल त्याला आपण तो मोदक देऊ, असे आश्वासन दिले. त्या क्षणी स्पंद तीर्थक्षेत्रांची परिक्रमा करण्यास गेला तर गणेशाने देवी पार्वती आणि शंकर भगवान यांना प्रदक्षिणा घातली. पूजा, यज्ञ, मंत्र, तीर्थक्षेत्रे एकीकडे तर मातापिता एकीकडे हा भाव व्यक्त करणाऱ्या गणेशाच्या बाजूने देवी पार्वतीने कौल दिला आणि गणेशाचे मोदकाशी नाते जुळले ते कायमचे.
दुसरी एक कथा अशी की, अत्री ऋषींची पत्नी अनसुया हिनं भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. गणपती बाप्पाची खवय्येगिरी लक्षात घेऊन तिने विविध पक्वान्न सिद्ध केले. पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागेना.
अडचणीत सापडलेल्या अनसुयेनं विचार केला की, गोड पक्वान्नानं गणपती बाप्पाचं पोट निश्चितच भरेल. तिनं नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला आणि बघता बघता त्या पदार्थाच्या सेवनानंतर बाप्पाचं पोट भरलं. त्यांनी 21 ढेकर देऊन पदार्थ आवडल्याची पोचपावती दिली.
देवी पार्वतीनं कुतुहलानं अनसुयेला त्या पदार्थाची कृती आणि नाव विचारले. तोच हा मोदक. आणि तेव्हापासून 21 मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो, असंही कथा सांगते. या पुराणातील मोदकाचा सध्याच्या मोदकांशी ऋणानुबंध आहे वा नाही हे मात्र या कथा स्पष्ट करत नाही. कारण प्राचीन काळात काही ठिकाणी लाडवांनाही मोदक म्हटल्याचा उल्लेख येतो. आपण सध्या खात असलेल्या उकडीच्या वा तळणीच्या मोदकांची पाककृती केव्हा अस्तित्वात आली याचा ठाम आधार सापडत नाही.
इसवी सन 750 ते 1200 यादरम्यान वर्णिलेल्या काही पदार्थांमध्ये मात्र या उकडीच्या मोदकाचा संदर्भ आढळतो. खोबरं न वापरता इतर वेगळी सामग्री वापरून गोड सारणाच्या साहाय्याने तयार एक पदार्थ मोदकांशी साधर्म्य राखतो. त्या पदार्थाचे नाव ‘ठडुंबर’ असे नमूद केले गेले आहे. मोदकासारखीच पाककृती असणाऱ्या एका पदार्थाला ‘वर्षील्लक’ असे म्हटले आहे. मात्र त्याच्या पाककृतीत दुधाचा वापर केलेला दिसतो. तांदळाचे पीठ वापरून बनवल्या गेलेल्या एका पदार्थाला मोदकच म्हटले आहे.
पांढऱ्याशुभ्र उकडीची पारी बघता बघता कळीदार होत आपल्या आत सारणाला सामावून घेते. केळी किंवा हळदीच्या पानांतून वाफांवर स्वार होत मोदक नैवेद्याच्या पानावर विराजमान होतो. बाप्पाचा खुललेला प्रसन्न चेहरा पाहात मोदकाचा घास घेताना शब्द स्मरतात.
मोदक हा मराठमोळय़ा खाद्यसंस्कृतीचा राजदूत आहे. मात्र आपल्या देशात विविध प्रांतांत मोदक आढळतात. त्यांची नावं वेगवेगळी असली तरी कृती तीच.
तमीळ भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कोळकटै’, मल्याळी भाषेत ‘कोळकटै’, कानडी भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कडबू’, तेलगू भाषेत ‘कुडुमू’ अशी त्याची अनेकविध नावं आहेत. या साधर्म्याचं साधारण कारण असं की, प्राचीन काळापासून देशभरात पूजेसाठी गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो. बारकाईने पाहिलं तर मोदकाचा आकार हा थोडासा नारळासारखाच भासतो. पूजेतल्या नारळाचा आकार आणि गूळ-खोबरं यांचा यथोचित संगम साधत कुणा सुगरणीनं हा शुभ्र योग साधला असावा.
आज मोदकाचं प्रचंड वैविध्य बाजारात उपलब्ध आहे, पण तरी उकडीचा किंवा तळणीचा मोदक यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही.
कासे पितांबराची धटी हाती मोदकांची वाटी
रामानंद स्मरता पंठी तो संकटी पावतो.



























































