
दादरच्या भवानी शंकर रोड येथील ब्राह्मण सेवा मंडळ यंदा शतक महोत्सव साजरा करणार आहे. यंदाचा गणेशोत्सव संस्मरणीय व्हावा यासाठी मंडळाने धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच श्रींच्या आगमनाचा सोहळा, श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्रावर्तन, महाप्रसाद व श्रींची पारंपरिक विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम योजिले आहेत.
ब्राह्मण सेवा मंडळाचा पहिला गणेशोत्सव 11 सप्टेंबर 1926 रोजी ‘मुपुंद मॅन्शन’मध्ये संपन्न झाला. यंदा 29 ऑगस्टला मुक्ता बर्वे ‘प्रिय भाई…एक कविता हवी आहे’ हा काव्यमय नाटय़प्रयोग, तर 1 सप्टेंबरला संकर्षण आणि स्पृहा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा एक मराठी साहित्य-मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतील. 30 ऑगस्टला ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ हा कार्यक्रम होणार आहे. 31 ऑगस्टला ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ तर 3 सप्टेंबला माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित ‘हसले मनी चांदणे’ कार्यक्रम होईल. 5 सप्टेंबरला ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन होईल.