
डीजेच्या आजारपणातून सोलापूरला मुक्त करण्यासाठी ‘फक्त एक मिस कॉल द्या’, अशी हाक वीरशैव व्हिजन व डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती ‘वीरशैव व्हिजन’चे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुल व कृती समितीचे अध्यक्ष ऍड. धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या सोलापुरात नोकरी-रोजगाराच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिणामी सोलापुरातील तरुण पुणे, मुंबई, बंगळुरू अशा मोठय़ा शहरांत कायमस्वरूपी स्थलांतरित होत आहेत. हे रोखण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात सोलापुरात विधायक कार्याऐवजी, पारंपरिक वाद्यांऐवजी तरुणांना डॉल्बी डीजेची आवड लागली आहे.
सोलापुरात होणाऱया विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱया डीजे डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या, हृदयाच्या, मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर आणि घातक आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना, गर्भवती महिलांना मोठय़ा आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ‘सोलापूर डीजेमुक्त क्हावे,’ अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. त्यांची इच्छा मिस कॉलच्या रूपात आमच्यापर्यंत पोहोचेल. जितक्या नागरिकांकडून मिस कॉल येतील, तेवढी संख्या पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात येऊन डीजे बंदीची मागणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाला ‘वेकअप सोलापूर डिजिटल मॅगझिन’चे संचालक राहुल शेटे यांचे सहकार्य लाभले आहे. कॉल केल्यानंतर मेसेज येणार आहे. ज्यांचा डीजेला विरोध आहे, त्यांनी 9168729729 या क्रमांकाकर मिस कॉल द्यावा, असे आवाहन वीरशैक व्हिजन व डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला असीम सिंदगी, कौस्तुभ करवा, राहुल शेटे, विजयकुमार बिराजदार, अमित कलशेट्टी, धानेश सावळगी, सोमनाथ चौधरी उपस्थित होते.