गणेशभक्तांसाठी मध्य, हार्बर रेल्वेची विशेष सेवा; मध्यरात्रीही लोकल धावणार

गणेशोत्सवात दर्शनाहून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे व परतीसाठी विशेष मध्यरात्री उपनगरी सेवा चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाडय़ा गणपती विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी धावतील.

मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल मध्यरात्री 1.40 वाजता सुटेल आणि कल्याणला 3.10 वाजता पोहोचेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी लोकल मध्यरात्री अडीच वाजता सुटेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याण विशेष गाडी मध्यरात्री 3.25 वाजता सुटेल आणि कल्याणला 4.55 वाजता पोहोचेल, तर अप मेन मार्गिकेवर कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी कल्याण येथून रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 1.30 वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 2 वाजता पोहोचेल. ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून मध्यरात्री 2 वाजता सुटेल.

6 आणि 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री दीड वाजता विशेष गाडी सुटेल आणि पनवेलला अडीच वाजता पोहोचेल. दुसरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 2.45 वाजता सुटेल आणि पनवेलला 4.05 वाजता पोहोचेल. अप हार्बर मार्गावर  पनवेल येथून मध्यरात्री 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 2.20 वाजता पोहोचेल, तर दुसरी विशेष गाडी पनवेल येथून मध्यरात्री 1.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.05 वाजता पोहोचेल.