मुंबईतील गणेशोत्सव साधेपणाच्या मखरात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचा निर्धार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य देखावे उभारले जाणार नसून रक्तदान, आरोग्य तपासणी, स्वच्छता असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयावर आज महापौरांसोबत झालेल्या निर्णायक बैठकीत एकमत झाले. गणेशमंडळांच्या या अभिनव उपक्रमाला पालिका प्रशासनाने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्सवाच्या पूर्वतयारीबाबत गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय गटनेते, पोलीस, वाहतूक पोलीस यांची ऑनलाइन बैठक घेतली. राज्य शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या निर्देशानुसार उत्सवाच्या तयारीची कामे होत असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. उत्सवासाठी विविध पदाधिकाऱयांनी केलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देशही महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले. शिवाय ‘सीएसआर’ फंडातून विविध गणेश मंडळांना जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी नियमावली बनवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, घरगुती गणेश मूर्तींबाबत एक अंतिम मसुदा तयार करण्यात येत असून तो लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती यावेळी सहआयुक्त नरेंद्र बर्डे यांनी दिली. या बैठकीला उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, गणेशोत्सव समन्वय समिती शहरचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर, उपनगरे सचिव विनोद घोसाळकर, गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर उपस्थित होते.

मंडळे, मूर्तिकार संघाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार!
काही गणेशोत्सव मंडळांच्या मागणीनुसार आर्थिक ताळेबंद सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मूर्तीकार संघाच्या प्रश्नांबाबत पदाधिकाऱयांनी केलेल्या सूचनांबाबत प्रलंबित मागण्यांची एक यादी तयार करावी असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. ‘बेस्ट’च्या वीज पुरवठय़ाबाबत एक आठवडय़ात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.