
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्यात घरोघरी गणरायाचे पूजन करण्यात येत आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस नऊ दिवस व अकरा दिवस घरोघरी गणेशाचे पूजन केले जाणार आहे.कोकणासह गोव्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गोव्यात गणेश चतुर्थी साजरी करण्याचा अनेक प्रथा आहेत. काही गावांमध्ये गौरी पूजन पाचव्या किंवा सहाव्या दिवशी केले जाते. तरी काही गावांमध्ये ओवसाची परंपरा आहे. माटोळीला जंगलातील विविध प्रकारची फळे फुले बांधण्याची पद्धत आहे. तर काही गावामध्ये नववधुच्या घरी माहेराहून ओझे (चतुर्थी निमित्त दिले जाणारे गोड पदार्थ व साहित्य) दिले जाते.
गोव्यात काही गावांमध्ये गणपतीपूजनाबरोबरच गौरी पूजनही केले जाते. चतुर्थी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी गौरी पूजन केले जाते. घरातील सुवासिनी महिला जवळच्या जलाशयातून कलशातून पाणी आणतात. त्यात हळदीची पाच पाने नारळ ठेवला जातो. वाजत गाजत तो कलश गणपतीच्या मखराच्या शेजारी ठेवले जाते. त्यानंतर सुवासिनीकडून त्याची पूजा केली जाते. गाऱ्हाणे घातले जाते. सायंकाळी पुन्हा त्या कलशातील पाणी ज्या जलाशयामधून आणले तेथे सोडले जाते. त्यानंतर भाजी भाकरी प्रसाद म्हणून सर्वाना वाटला जातो. सत्तरीतील बहुतेक गावामध्ये ही परंपरा आहे. गणपती प्रमाणे गौरी पूजनाला मोठे महत्व आहे.
सत्तरी डिचोली तसेच अन्य तालुक्यातील गावांमध्ये गौरी पूजनानंतर ओवसे वाटले जातात. महिला हातात परात घेऊन गावातील प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीसमोर आपला ओवसा ठेवतात. माटोळीची अनेक प्रकारे सजावट केली जाते. माटोळीला जंगलात मिळणारी सर्व प्रकारची फळे बांधली जातात. तसेच रानात मिळणारी खास रानफळे व फुले बांधली जातात. यात कांगले, कात्रे, कमडळा, कध्याफळ, ताबलेफळ, भिल्लफळ, माट्टीकात्रे, पत्रेफळे, कुढ्याकात्रे, उमळीफळ, आटकेफळ, मावळिंग,आदिंचा त्यात समावेश असतो. खास चतुर्थीमध्ये अशी फळे फुले विक्रीसाठी माटोळी बाजार भरतात, त्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. गोव्यातील नववधुला तिच्या माहेराहून सासरी ओझे दिले जाण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. यात चतुर्थीला लागणारा सर्व साहित्य, गोडधोड पदार्थ देवाचे साहित्य यांचा समावेश असतो. पूर्वी माटोळीचे सर्व साहित्य नववधुला सासरी द्यावे लागत होते.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यातील जनतेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश म्हणजे ज्ञानाचे व बुद्धीचे दैवत. गणेश चतुर्थी सणामुळे राज्यातील लोकांमध्ये एकता आणि सामाजिक सलोखा मजबूत होतो. यंदाचा हा सण गोव्यातील लोकांना सुखसमाधान, शांतता आणि भरभराट घेऊन येवो, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. आपला परिसर स्वच्छ, प्लॅस्टिक आणि प्रदूषणमुक्त करूया आणि पर्यावरणास अनुकूल असा गणेश चतुर्थी उत्सव साजरा करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.




























































