
लग्नासाठी बनावट मुलगी दाखविण्याचा बहाणा करून नवरदेवाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या, बनावट लग्न जमवून देणाऱ्या टोळीतील तीन महिलांसह दोन पुरुषांना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. विजय देविदास पवार (वय 25, रा. लोधी मुहल्ला, जि. जालना) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार भानुदास कासार, कोमल राजू साठे, संगीता वसंत जाधव (रा. पैठण, जि. संभाजीनगर), सुमन रमेश वाघमारे (रा. हडपसर, पुणे), रावसाहेब नारायण वानखेडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विजय पवार याचे लग्न जमत नसल्यामुळे त्याने आपली बहीण मनीषा ब्राह्मणे आणि तिची सासू वत्सला ब्राह्मणे (दोघी रा. तीर्थपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना) यांना मुलगी बघण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे मनीषाने गावातील ओमकार कासार याला एखादे स्थळ बघण्यासाठी सांगितले. त्यावेळी कासार याने एक मुलगी असून तिच्या आई-वडिलांकडे लग्न लावून देण्यासाठी पैसे नाहीत. या लग्नासाठी तुम्हाला एक लाख 20 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार विजय, त्याची बहीण आणि तिची सासू हे खासगी गाडीने शुक्रवारी नेवासा बसस्थानकात आले. तेथे ठरलेले पैसे द्या, मी तुम्हाला मुलगी दाखवतो, असे कासार याने सांगितले. त्यामुळे विजयने तेथील एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघाले नाहीत. त्यानंतर कासार याने एका महिलेला फोन करून नेवासा बसस्थानकात बोलाविले. तिने आपणच नवरी असून आपले नाव कोमल साठे, मावशीचे नाव संगीता जाधव, तर सोबत असलेल्या आणखी एका महिलेचे नाव सुमन वाघमारे असल्याचे सांगितले.
विजयने कोमलला तिच्या आई-वडिलांबाबत विचारले असता, मला आई-वडील नसल्याचे तिने सांगितले. मात्र, कासार याने मुलीचे आई-वडील गरीब असल्याचे सांगितल्याने फसवणुकीचा डाव विजयच्या लक्षात आला. काही वेळानंतर तेथे रावसाहेब वानखेडे नावाचा एक व्यक्ती आला. त्याने विजयकडे पैशांची मागणी करून मुलीवर अतिप्रसंग केला म्हणून आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्यांचा डाव लक्षात येताच, विजयने नेवासा पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार तातडीने पथकासह बसस्थानकात आले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी विजय पवारच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
































































